Ambegaon | आंबेगाव : १९७२ सालच्या दुष्काळात बेपत्ता झालेली व्यक्ती तब्बल ५० वर्षानंतर त्यांच्या मूळ गावी परत आल्याची घटना जवळे (ता.आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. १४) दुपारच्या उघडकीस आली आहे. तर बेपत्ता झालेली व्यक्ती परत आल्यामुळे नातेवाईकांना सुखद धक्का बसला असून त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
शिवराम कोंडीभाऊ गावडे (वय-७५, मूळ रा. जवळे, ता.आंबेगाव) असे मुळगावी परत आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवराम गावडे हे १९७२ सालच्या दुष्काळात कुणालाही काहीही न सांगता काम शोधण्यासाठी मुंबईला गेले होते. गावडे हे घरातून गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी २०११ साली ते बेपत्ता असल्याची तक्रार मंचर पोलीस ठाण्यात दिली होती. कालांतराने ती मिसिंग नियमानुसार केस फाईल झाली होती. नंतर त्यांच्या नातेवाईकांनी ते मयत झाल्याचे समजून त्यांचा मृत्यूचा दाखलादेखील काढला होता.
१९७२ सालच्या दुष्काळात काम शोधण्यासाठी मुंबईला…
दरम्यान, शिवराम गावडे हे त्यांच्या गावी जवळे येथे शुक्रवारी दुपारच्या सुमारास आले. त्यांनी सांगितले की, ”मी आत्तापर्यंत मुंबईत काम करीत होतो. आता वय झाल्याने मला काम होत नाही. त्यामुळे मुंबईतून निघून आता माझ्या मूळ गावी आलो आहे. तसेच लग्नही केले नाही. ”
शिवराम यांच्या परतण्याने त्यांची बहीण पार्वताबाई (वय ६७) व शिवराम यांच्या भावाचा मुलगा संतोष देवराम गावडे (वय ४२) यांचा विश्वास बसला नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने पारगाव कारखाना पोलीस स्टेशन येथे शिवराम यांना घेवून गेले. तेथे त्यांनी घडलेली माहिती दिली.
त्यानंतर पारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे “तुला किती भाऊ आहेत ? बहिणी किती? आई-वडिलांचे नाव काय? याबाबत सविस्तर चौकशी केली असता शिवराम यांनी बरोबर उत्तरे दिली. त्यांच्या नातेवाईकांना ते ५० वर्षांपूर्वी मिसिंग झालेली व्यक्ती असल्याची खात्री पटली. त्यानंतर पारगाव पोलिसांनी त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.
शिवराम गावडे यांना नातेवाईक घरी घेऊन गेले आहेत. तर पन्नास वर्षानंतर कुटुंबातील सदस्य आल्याने नातेवाईकांना सुखद धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावडे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Ambegaon News : बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र थांबेना ! दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर केला हल्ला