भोर : भोर-मांढरदेवी- वाईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या वाहतुकीच्या मार्गावरील आंबाडखिंड (ता.भोर) घाटरस्ता मागील सहा महिन्यांपासून रस्त्याच्या कामासाठी बंद होता. मात्र, मांढरदेवीला जाणाऱ्या-येणाऱ्यांची, तसेच कामगार वर्गाची गैरसोय पाहता हलक्या वाहनांसाठी रस्ता खुला केल्याची माहिती शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.
पुणेहून भोरमार्गे आंबाडखिंड घाट रस्त्यावरून वाई, महाबळेश्वर, पाचगणीला मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असते. मात्र, रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने घाटरस्ता सहा महिन्यांपासून बंद करण्यात आला होता. नागरिकांची वाहतुकीची घाट रस्त्यावरून गैरसोय होत असल्याने प्रशासनाने घाट रस्त्यावरील सुरू असलेल्या पुलाच्या कामाशेजारी वाहनचालकांसाठी रस्ता तयार करून दिला आहे. यामुळे छोट्या-मोठ्या वाहनचालकांनी रस्त्यावरून ये-जा सुरू केले आहे. घाट रस्त्याचे काम पूर्ण होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. वाहनचालकांनी घाट रस्त्यावरून प्रवास करताना सावधानता बाळगून प्रवास करावा. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होईल, असा प्रवास करण्याचे वाहनचालकांनी टाळावे, असे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंत्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.
ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावावेत
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आंबाडखिंड घाट मार्गे हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू केली आहे. तसेच, वाई-मांढरदेवीला जाणाऱ्या प्रवाशांना सोईस्कर झाले आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घाट रस्त्यावरील धोक्याच्या ठिकाणांवर रिफ्लेक्टर बसवावेत, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.