यवत : आवडते मज मनापासूनी शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा ! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत, हे सत्य आहे. याच पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज खामगाव विद्यालयात २००८ मध्ये दहावीत असलेले माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले होते.
दौंड तालुक्यातील खामगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचे माजी विद्यार्थी योगेश खेडेकर, वैभव नागवडे, गोपाल नागवडे, सुहास नागवडे, केशव जगताप, सुशांत जगताप, गायत्री घोळे, शितल घुले, हनुमंत कोळपे, अर्चना जगताप, मिलिंद शिरोळे यांनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जवळजवळ १६ वर्षांनंतर एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला.
अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र-मैत्रिणी भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन व द्वीपप्रज्वलन मान्यवरांच्या व शिक्षकांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी शाळेत बरोबर असलेले परंतु सध्या हयात नसलेल्या मित्रांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वांना आजची भेट व आठवणी पुढील जीवनात आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील, अशा भावना माजी विद्यार्थिनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी माजी विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही भावूक झाल्याचे दिसून आले.
प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे, हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. कार्यक्रमावेळी जुन्या आठवणींना उजाळा म्हणून खंडेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन माणिकराव नागवडे व शिक्षकांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. शाळेचे माजी मुख्याध्यापक, मुख्याध्यापक नेवसे यांच्यासह वनवे, पाटील, सूर्यवंशी, नामदास, दुधाळ, चत्तर, दोरगे या शिक्षकांबरोबरच थोरात, दुधात या शिक्षिका यांसह इतर शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.