लोणी काळभोर, (पुणे ) : लोणी काळभोर व कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल गुन्हेगार राज रवींद्र पवार (वय-25, रा. कवडीपाट टोल नाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) याला येरवडा कारागृहात 10 दिवसासाठी स्थानबद्ध केले आहे.
ही घटना ताजी असतानाच आता त्याच्या अजून एका साथीदाराला पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने येरवडा कारागृहात 5 दिवसासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे.
सोमनाथ उर्फ डच्या बबन लोंढे (वय-19, रा. कवडीपाट टोल नाका, कदमवाकवस्ती ता. हवेली, जि. पुणे) असे येरवडा कारागृहात 5 दिवसासाठी स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज पवार व सोमनाथ उर्फ डच्या लोंढे याने त्यांच्या साथीदारासह कवडीपाट टोल नाका परिसरात राहुलकुमार सैनी यांना मारहाण केली होती. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतरही डच्या लोंढे याने गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून प्लॉटिंग मालक तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर यांना फोन करून शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली होती.
राज पवार हा लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, तो त्याच्या दोन-तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे करीत आहे. राज पवार व डच्या लोंढे याच्यावर शरीर व मालमत्तेविरुद्धचे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला होता.
दरम्यान, राज पवार व सोमनाथ उर्फ डच्या लोंढे या दोन्ही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव हा पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केला असता, सर्वात प्रथम न्यायालयाने राज पवारला येरवडा मध्यवर्ती कारागृहात 10 दिवसासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी राज पवारला येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
त्यानंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने डच्या लोंढे यालाही येरवडा मध्यवर्ती कारागृहात 5 दिवसासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी डच्या लोंढेलाही येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सदर कारवाई पोलीस उपयुक्त आर. राजा, सहाय्यक पोलिस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दत्ताराम बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस हवालदार तेज भोसले, पोलीस नाईक संदीप धनवटे, पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे व पोलीस अंमलदार प्रशांत नरसाळे यांनी केली आहे.
यापुढेही शरीर व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा शोध घेऊन, त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
शशिकांत चव्हाण, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)