अजित जगताप
वडूज : खटाव तालुक्यातील वाकळवाडी या ठिकाणी प्रतिबंधित मानवी शरीरास अपायकारक असलेल्या अफू निर्मिती पीक तसेच औषधी द्रव्य आढळून आले आहे. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पंच व फोटोग्राफर समक्ष धाड टाकली. यामध्ये ७५.४८० किलो सात पोत्यामधील एक लाख बावन हजार २९६ किमतीचा प्रतिबंधित असलेला गांज्या वडूज पोलिसांच्या हाती लागला आहे.
याप्रकरणी वाकडवाडी येथील दोन महिला व एक पुरुष आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले आहे. वाकळवाडी ता. खटाव येथील एका शेतात सामायिक क्षेत्र असून सदरचे शेत श्रीमती विमल पंढरीनाथ म्होत्रेकर यांच्या नावावर असून यांच्या वाट्यास आलेल्या पिकांमध्ये ९.८३० किलोग्रॅम असा एकोणीस हजार सहाशे रुपयांचा सापडला आहे.
तर शांताराम रामचंद्र म्होत्रेकर यांच्या शेतामध्ये २५.८७ किलो व श्रीमती चंद्रभागा शिवाजी म्होत्रेकर यांच्या शेतात ४०.७४० किलो असा मिळून ७५.७४० किलोग्रॅम गांज्याची झाडे आढळून आलेले आहेत. त्याचा पंचनामा करून आरोपी विरोधात अंमली औषध द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम कलम ८,१५,१८,२२,प्रमाणे सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद देण्यात आलेले आहे.
या धाडीच्या वेळेला खटावचे नायब तहसीलदार कर्णे, मंडल कृषी अधिकारी मधुकर जाधव, कृषी पर्यवेक्षक श्रीकृष्ण माने, पंच सचिन वाघमारे, संपत पाटोळे, तानाजी पवार तसेच पोलीस यंत्रणेमार्फत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शितल पालेकर, पोलीस हवालदार देवकुळे, माने, देवकर, नरडे, बदडे, शेडगे, हांगे, भोसले, लोखंडे, काटकर, जगताप यांनी सहभाग घेतला.
दरम्यान, यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गहू, हरभरा ,कांदा पिकाच्या मधोमध आडोशाला ही गांजाची लागवड करण्यात आली होती. बातमीदारांकडून कळलेल्या माहितीनुसार सर्व साहित्य ही पाहणी करून त्या ताब्यात घेण्यात आली.
रासायनिक विश्लेषणासाठी ते पाठवण्यात आले असून एवढ्या मोठ्या प्रमाणात खटाव तालुक्यात गांज्याची रोपे असलेला मुद्देबाज सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.
या कामगिरीबद्दल सातारा पोलीस दलातील वरिष्ठांनी सर्व सहभागी वडूज पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन केले आहे.