गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील खुटबाव ग्रामपंचायतीच्या वतीने तब्बल २९ दिव्यांग बांधवांच्या खात्यावर ५ टक्के निधीचे वाटप करण्यात आले. यामध्ये लाभार्थीच्या खात्यावर १ लाख ४५ हजार रुपये जमा करण्यात आले.
दिव्यांगांसाठी स्वनिधीतील ५ टक्के निधी राखीव ठेवून, तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा, असे आदेश ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिले आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनेतील रक्कम स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांगांच्या खात्यावर थेट जमा करणे अपेक्षित असते. स्वनिधीतील ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे अपेक्षित आहे. हा निधी दिव्यांगांसाठी वैयक्तिक व सामाजिक स्वरूपाच्या योजनांवर खर्च केला जात असताना, बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वैयक्तिक लाभाच्या योजनांवर अधिक खर्च करून या बांधवांना हातभार लावला जातो. व्यक्तिगत विकासासाठी या योजना हाती घेणे गरजेचे असले, तरी हा निधी त्या प्रवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी उपलब्ध करून देण्यावर शासनाने भर दिला आहे.
दौंड तालुक्यातील खुटबाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांसाठी नेहमी विविध उपक्रम राबवले जातात. यामुळे सर्व दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब जगताप, दौंड तालुका प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष नानवर तसेच खुटबाव गावाचे अध्यक्ष राजू शितोळे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते.