पुणे: पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविणाऱ्या सर्व ३०३ उमेदवारांना निवडणूक खर्चाचा अंतिम हिशेब देण्यासाठी २३ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सर्व उमेदवारांना निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक शाखेकडे जमा करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारांकडून पुढील आठवड्यापासून खर्चाचा तपशील जमा होण्यास सुरुवात होईल. त्यात काही तफावत आढळल्यास त्याबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला जाईल. खुलासा समाधानकारक असल्यास संबंधित उमेदवाराचा खर्चाचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक खर्च निरीक्षक सोनप्पा यमगर यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी ४० लाख रुपयांच्या खर्चाची मर्यादा होती. अर्ज भरल्याच्या दिवसापासून निवडणुकीदरम्यान सर्व उमेदवारांना टप्प्याटप्प्याने खर्चाचे हिशोब द्यावे लागत होते. उमेदवारांनी दिलेल्या खर्चाचे हिशोब निवडणूक खर्च निरीक्षकांकडे आल्यानंतर त्यांच्याकडून तपासणी करण्यात येते. त्या तपासणीमध्ये प्रशासनाकडील खर्चानुसार, उमेदवाराच्या खर्चात काही फरक आढळल्यास त्याबाबत उमेदवाराकडे विचारणा केली जाते. त्याबाबत नोटीस जारी केली जाते. त्यासंदर्भात उमेदवाराने खुलासा दिल्यावर तसेच तो समाधानकारक असल्यास त्यांची बाजू ग्राह्य धरली जाते. खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांच्याकडे पुन्हा विचारणा होण्याची शक्यता असते. तसेच त्या उमेदवारालाही जिल्हा समितीकडे दाद मागता येते.
निवडणुकीदरम्यान उमेदवारांच्या खर्चाची तीन टप्प्यांत तपासणी करण्यात आली होती. त्यात अनेकांचे खर्चाचे हिशोब जुळत नव्हते. उमेदवारांकडे विचारणाही करण्यात आली होती. खर्चाच्या तफावतीबाबत अनेक उमेदवारांनी संबंधित निवडणूक खर्च निरीक्षकांकडे खुलासेही दिले आहेत. मात्र, आता निवडणुका पार पडल्या आहेत. निकालही जाहीर झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या खर्चाचा अंतिम हिशेब देणे सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे.