पुणे: नुकत्याच पार पडलेल्या पुणे शहर लोकसभा निवडणुकीच्या काळात दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यावर सर्वपक्षीय उमेदवार, पक्षाध्यक्ष, नेते यांनी एकत्र येऊन पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हे मागे घ्यावेत, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. निवडणुकीची धावपळ संपल्यानंतर रविवार १९ मे रोजी ‘झाली इलेक्शन, जपुया रिलेशन’ हा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांचा मेळावा अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संपन्न झाला. यासाठी पुणे शहर लोकसभेच्या निवडणुकीतील सर्व पक्षाच्या उमेदवारांना निमंत्रण देण्यात आले होते.
याप्रसंगी लोकसभेच्या उमेदवारांपैकी आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते. सर्व पक्षीय नेत्यांपैकी काँग्रेसचे मोहन जोशी, कमल व्यवहारे, गोपाळ तिवारी, भाजपचे अशोक एनपुरे, नामदेव माळवदे, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, चंदन साळुंखे, रूपेश पवार, राष्ट्रवादीचे (शरद पवार पक्षाचे) गणेश नलावडे, नीलेश वरे, रोहन पायगुडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गटाचे) अजय दराडे, सुनील खाटपे, आम आदमी पार्टीचे प्रवक्ते किरण कद्रे, संघटन मंत्री संदेश दिवेकर आदी उपस्थित होते.
तुषार काकडे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, की निवडणुकीच्या काळात एकमेकांच्या विरोधात प्रचार करणारे कार्यकर्ते खरेतर एकमेकांचे मित्रच असतात. त्यामुळे पुन्हा सौहार्दपूर्ण संबंध व्हावेत, यासाठी हा कार्यक्रम आम्ही घेतल्याचे नमूद केले. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर म्हणाले, की आम्ही सर्व प्रमुख पक्षांचे उमेदवार यांनी नगरसेवक म्हणून एकत्र काम केलेले असल्यामुळे कटुता अजिबात नव्हती. काही ठिकाणी हुज्जत वा धक्काबुक्की झाली हे खरंय, पण निवडणूक संपल्यावर सगळेच ते विसरले असतील. मी निवडून आलो, तर इतरांच्या मनातील योजना मार्गी लावेल, दुसरा उमेदवार निवडून आला, तर मी माझ्या मनातील योजना त्याच्याकडून पूर्ण करून घेईन. पूर्वी संसदेत पंडित नेहरूंची हटवलेली तसवीर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी पुन्हा लावून घेतली होती, एवढं मनाचे मोठेपण दुर्मिळ होत चाललंय, अशी आठवण गोपाळ तिवारी यांनी सांगितली. ते पुढे म्हणाले, की सध्या नेत्यांकडून जी ताळतंत्र सोडून वक्तव्ये केली जातात, त्यावर आता कार्यकर्त्यांनीच दबाव आणला पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुषार काकडे यांनी केले.
स्वप्नील खडके यांनी सूत्रसंचालन केले. भोला वांजळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभियान प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार, रोहन पायगुडे, अभिजित म्हसवडे, मनोज शिंदे, कपिल पवार, संतोष हेंद्रे, प्रदीप भोसले, पंकज शहा आदींनी विशेष परिश्रम घेतले.