पुणे : ९१ मध्ये ज्यांचा जन्मही झाला नव्हता ते म्हणतात की, सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या. मग मागच्या ३०-३५ वर्षांत आम्ही काय केलं? असा सवाल अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तथा बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज पार पडला. यावेळी अजित पवारांनी पवार कुटुंबातील इतर सदस्यांवर जोरदार निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले की, काल पवार कुटुंबातील सगळे लोक साहेबांच्या पायाशी बसले होते. याआधी असं कधी घडलं नव्हतं. मात्र, आता लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसंच आमचे चिरंजीव म्हणाले की, सगळ्या संस्था साहेबांनीच आणल्या. मग मागच्या ३०-३५ वर्षांत आम्ही काहीच केलं नाही का? आणि अनेक संस्था बारामतीत आधीपासूनच होत्या. छत्रपती कारखाना कुणी काढला, माळेगाव कारखाना कुणी काढला, हे सगळ्यांना माहीत आहे. विद्या प्रतिष्ठानची स्थापना साहेबांनी केली. मात्र १९९१ साली मी खासदार झाल्यानंतर त्या संस्थेचा वेगाने विस्तार केला, असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जात आहेत. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाहीत. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण बारामतीतच गेलं आहे. येथील सर्व स्थित्यंतराचे वडिलधारी लोक साक्षीदार आहेत, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
गावकी-भावकीची ही निवडणूक नसून ही देशाची निवडणूक आहे. देशाच्या १३५ कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सासू-सुनेची, नणंद भावजयीची निवडणूक नाही. तर ही निवडणूक मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे, असं अजित पवार यावेळी म्हणाले.