आळंदी : येथील समाजभूषण ह. भ. प. आनंद महाराज तांबे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी शनिवारी निवड करण्यात आली. आळंदीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील सर्व कमिटीच्या झालेल्या बैठकीत ह. भ. प आनंद महाराज तांबे यांची अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी एक मताने निवड करण्यात आली.
तांबे महाराज गेली अनेक वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, संप्रदाय कार्यक्रमातून समाज प्रबोधन करतात. तसेच वारकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. वारकरी सांप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार म्हणूनही त्यांचा नावलौकिक संपूर्ण राज्यात आहे. थेऊर येथील चिंतामणी मंदिराचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
या आधीही त्यांनी वारकरी मंडळावर तालुकाअध्यक्ष, पुणे जिल्हा कमिटी, पश्चिम महाराष्ट्र पुणे विभाग, राज्य कमिटी प्रमुख म्हणून विविध पदावर काम केले असून, अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वारकरी संप्रदायासह सर्वच स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, मार्गदर्शक मुक्ताजी दादा नाणेकर, सचिव सूर्यवंशी महाराज, अध्यक्ष सुखदेव महाराज ठाकर, राज्य कमिटी तुकाराम गवारी महाराज, विभाग सदस्य गणेश ढावरे पाटील, अध्यक्ष संतोष महाराज काळोखे, सचिव संदीप भाऊ बोत्रे मंडळाचे अनेक पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.