पुणे : अक्षय तृतीया (Akshay Tritiya) म्हणजेच साडेतीन मुहुर्तांपैकी एक दिवस. आज पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीला (Dagdusheth Ganpati) 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या, लाडक्या गणरायाभोवती आंब्याची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
तसेच गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारापासून ते गाभाऱ्यापर्यंतगी रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली. अशा या मंगलमय वातावरणात स्वराभिषेकातून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी गायिका मनीषा निश्चल आणि सहकार्यांनी गायन सेवा अर्पण केली. पहाटे ब्राह्मणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. त्यानंतर आंब्याचा हा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. मंदिरात केलेली ही आंब्याची आरास पाहण्यासाठी तसेच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठी गर्दी केली होती.