भिगवण (पुणे) : स्वातंत्र्यपूर्वकाळापासून आज पर्यंत पत्रकारांनी समाजासाठी अविरत संघर्ष केलेला आहे. आणि हा संघर्ष अजूनही सुरु आहे. पत्रकारीता क्षेत्र हा काळानुसार बदलताना दिसत आहे. पत्रकाराच्या लेखणीने अगदी केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचा काळा बाजार ही उघडकीस आणून त्याला पदावरून पायउतार करायला लावू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या आपण रोज दैनंदिन वर्तमानपत्रात वाचत आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार तानाजीराव काळे यांनी भिगवण पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहणावेळी मांडले.
येथील हॉटेल ज्योती व्हेज मधील सभागृहात भिगवण मराठी पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारीणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पत्रकार संघाच्या अध्यक्षदाची जबाबदारी तरुण भारतचे पत्रकार आकाश पवार यांनी स्वीकारली. तसेच सचिवपदी पत्रकार महेंद्र काळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा.रामदास झोळ यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, झपाट्याने भिगवणचा विस्तार वाढत चालला आहे. भिगवण हे शहरीकरणाच्या वाटेवर असल्यामुळे या भिगवण शहरात अनेक आद्योगिक, राजकीय, शैक्षणिक बाबतीत विविधता असून या सर्व घटकांवर परखड मत मांडण्यासाठी पत्रकार हा एक महत्वाचा घटक आहे.
नूतन अध्यक्ष आकाश पवार यांनी आपले अध्यक्षपद आई व वडील यांना समर्पित केले. तसेच पत्रकारांना मार्गदर्शनपर कार्यशाळा घेणे, समाजातील अन्यायग्रस्तांना पत्रकारितेच्या माध्यमातून योग्य न्याय मिळवून देणे. तसेच समाज प्रबोधनासाठी प्रयत्नशील राहणार असून भिगवण हे गाव हरित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत नूतन अध्यक्ष आकाश पवार यांनी मांडले.
पत्रकार संघाच्या पद्ग्रहण कार्यक्रमावेळी जेष्ठ मार्गदर्शक अशोक शिंदे, भिगवण गावच्या सरपंच दिपीका क्षीरसागर, सचिन बोगावत, मावळते अध्यक्ष तुषार क्षीरसागर आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध गावचे सरपंच, विविध संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रशांत चवरे यांनी केले. सुत्रसंचालन सागर जगदाळे व प्रा.तुषार क्षीरसागर यांनी केले तर आभार आप्पासाहेब गायकवाड यांनी मानले.
मराठी पत्रकार संघ नुतन कार्यकारीणी :
अध्यक्ष – आकाश पवार, सचिव –महेंद्र काळे, उपाध्यक्ष-सागर जगदाळे(इंदापूर विभाग)व आप्पासाहेब मेंगावडे(दौंड विभाग), खजिनदार –प्रा.सागर घरत, कार्याध्यक्ष- विजय गायकवाड(अकोले), संघटक-आप्पासाहेब गायकवाड, समन्वयक – संतोष सोनवणे.