मंचर : शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी मंचरमध्ये उपस्थित राहिले. अजित पवार यांचे स्वागत करत, त्यांनी त्यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास केला. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा रंगली आहे.
मंचरमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी तसेच शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी अजित पवार आले असता, त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. त्यामुळे आढळराव पाटील यांची शिरूर लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे. मात्र, उमेदवारी नक्की कधी जाहीर होते आणि पक्षप्रवेश कधी होतो हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.
अजित पवार म्हणाले की, शिरुर लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चनही निवडून आले, त्यानंतर राजीनामा दिला; पण त्यांना मतदारांचे काही पडलेले नसते. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार (अमोल कोल्हे) भेटले. मी म्हटलं, डॉक्टर आधी राजीनामा द्यायचा म्हणत होता, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढे आणतो. अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली.