पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून प्रचाराचा अंतिम टप्पा सूरु आहे. अनेक नेते एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहेत. प्रचारसभा पार पडत आहेत. अशातच राज्यात बारामती विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीचा गड जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. ते गावोगावी जात असून तडाखेबंद भाषण करत आहेत. लोकसभेला पवार साहेबांना साथ दिली. आता मला विधानसभेत पाठवा असे आवाहन ते मतदारांना करत आहेत.
तसेच अखरेच्या टप्प्यात त्यांनी युगेंद्र पवार आणि प्रतिभा काकीवर सुद्धा निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी अजून एक मोठा पत्ता टाकला आहे. काही दिवसांपूर्वी रासपचे महादेव जानकर यांनी जाहीर सभेत जे वक्तव्य केले होते. तोच मुद्दा स्वत: अजितदादांनी मांडला आहे.
महादेव जानकर नेमकं काय म्हणाले होते?
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या महायुतीच्या वाड्यात आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी सत्ता केंद्र पवार कुटुंबियातच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. अजित पवार बाजूला झाल्यानंतर शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यावर त्यांनी शरद पवार यांनी पवार सोडून इतर कुणाला का उमेदवारी दिली नाही? असा प्रश्न केला होता.
तुम्हाला तसं करायच असेल तर उघड करा..
अजित पवार म्हणाले की, माळेगांवमधील काही पुढारी चुकीचं काम करत आहे. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला तसं करायच असेल तर उघड करा. पूर्वी आमदार झालो त्यावेळी याठिकाणी काय होतं? कुसलं यायची आता काय परिस्थिती आहे, त्यामुळे तुम्ही विचार करून मला साथ द्या, असे आवाहन अजितदादा यांनी केले.
तुम्हाला पैसे देऊन आणलं का?
एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाचा माळेगांवच्या सभेला महिला आल्या आहेत. तुम्हाला पैसे देऊन आणलं का? कारण दोन दिवसापूर्वी पैसे देऊन सभेला आणलं गेलं. असं कधीच आजपर्यंत झालं नाही. मात्र, ही पद्धत अतिशय चुकीची आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. मी उद्या सभा घेणार आहे. ते पण सभा घेणार आहेत ते त्यांचा विचार मांडतील मी माझा विचार मांडणार आहे. पुढच्या पिढीसाठी कुणाला साथ द्यायची हे ठरवा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
पवार साहेबांनंतर बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो?
पवार साहेब रिटायर झाले. मग बारामतीकडे कोण लक्ष देऊ शकतो? साहेबाचा आदर राखून ताईंना साथ दिली. लोकसभेला साहेबांना साथ दिली. मी न मागता सगळं करतोय, याची तुम्हाला किंमत कळत नाही. मी कॅनॉलचे पाणी आणले. नाही तर ऊसाची पाचट झाली असती, विनंती करणे माझं काम आहे. मतदार म्हणून निर्णय तुमचा आहे, अशी भावनिक साद अजित पवार यांनी मतदारांना घातली.