बारामती : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून त्या अनुषंगाने राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. अनेक नेते दावे प्रतिवदावे करताना दिसत आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक विधान केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे कधी कधी मिश्किलीपणे बोलून जातात आणि नंतर तो मोठा चर्चेचा विषय ठरत असतो. अजित पवारांनी बारामतीत एका कार्यक्रमात केलेले विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांनी म्हटले की, “भावंडं असेपर्यंत घर एक असतं.” या वक्तव्याला उपस्थितांकडून मोठी दाद देण्यात आली.
हे विधान कौटुंबिक असलं तरी त्याला राजकीय अर्थही आहे, ज्याकडे कोणी दुर्लक्ष करू शकत नाही. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात झालेल्या लढतीच्या अनुषंगाने या विधानाचा मतितार्थ काढला जात आहे. शरद पवार यांनी या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास मात्र नकार दिला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांनीही या विषयावर बोलायला टाळले आहे.