बारामती : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघाच्या लढतीकडे महाराष्ट्राचे विशेष लक्ष असणार आहे. कारण निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासूनच बारामती मतदारसंघ सातत्याने चर्चेत आहे. प्रथम बारामतीच्या उमेदवारीवरून संघर्ष पहायला मिळाला. त्यानंतर विजय शिवतारेंनी डोकेदुखी वाढवली. शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी शांत केले. आता हर्षवर्धन पाटलांनी बारामतीमध्ये टेन्शन वाढवले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या घटक पक्षांची समन्वय बैठक बोलावण्यात आली आहे. या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील वाद समोर आल्यानंतर महायुतीच्या घटक पक्षांची समन्वयक बैठक बोलावली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महायुतीच्या घटक पक्षातील नेते उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परंतु या घटक पक्षाच्या बैठकीला विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याचे कळत आहे. यामुळे संभ्रम वाढला आहे.
दरम्यान, मित्र पक्षाचे लोक धमकी देतात, दमदाटी करतात अशी तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हर्षवर्धन पाटील यांनी केली होती. हर्षवर्धन पाटलांनी पत्रातून आरोप केले होतेच. मुलगी अंकिता पाटीलनेदेखील अजित पवारांवर आरोप केले होते. या प्रकारांवर पडदा पाडण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या बैठकीला हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या घरात लग्नसोहळा असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाहीत, असे सांगण्यात येत आहे.
विजय शिवतारे बारामतीतून लढण्यास इच्छुक आहेत. बारामती ही पवारांची मक्तेदारी नाही, म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बैठकीसाठी बोलवले होते. त्यानंतर रुग्णालयात मंत्री दीपक केसरकर आणि खासदार राहूल शेवाळेंनी शिवतारेंची भेट घेतली होती. मात्र, शिवतारेंनी आपला निर्णय अद्याप मागे घेतलेला नाही. समन्वय समितिच्या बैठकीला ते उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.