पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्ष बैठका आणि मेळाव्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशातच लोकसभा निवडणुकीत अवघा एक खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुर केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
त्याच रणनीतीचा एक भाग म्हणून पक्षाच्या कार्यक्रमात बॅनर्स, पोस्टर्स आणि जाहिरातींवर अधिकाधिक गुलाबी रंगाचा वापर केला जाणार आहे. हा गुलाबी रंग लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी अजित पवार हे देखील दैनंदिन जीवनात गुलाबी रंगाचा वापर करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत अजित पवारांचे पिंक पॉलिटिक्स नेमकं काय? हे बघायला मिळणार आहे.
दरम्यान, अजित पवार गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये दिसल्याने पत्रकारांनी अजित पवारांना गुलाबी जॅकेटबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी अजित पवारांनी आपल्या जॅकेटवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, ” येथे प्रत्येकानेच वेगवेगळे शर्ट घातलेले आहेत. मी कोणते कपडे परिधान करायचे हा माझा अधिकार नाही का? मी माझे कपडे माझ्या पैशाने घालतो. तुमच्या कोणाच्या पैशाने मी माझे कपडे घेतो का? जे कपडे सामान्य माणूस घालतो, तेच कपडे मी परिधान करतो. मी काहीतरी वेगळं केलेलं नाही. माझ्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करतो, असे अजित पवार यांनी एकदम कडक शब्दात स्पष्ट केले आहे.