पिंपरी : आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ बालेवाडीमध्ये करण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. महिलांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद दिसत असल्याने लाडकी बहीण योजना तात्पुरती असल्याचे विरोधक सांगत आहेत. तसेच महायुतीचे सहकारीही उत्साहाच्या भरात पैसे परत घेणार असे सांगत आहेत. मात्र, हे पैसे भाऊबीज म्हणून दिले असून परत घेतले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने मी सांगतो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
काय म्हणाले अजित पवार?
महिला सक्षम, सबळ झाल्या पाहिजेत यासाठी ही योजना आणली आहे. कारण नसताना विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत. भावांकडे लक्ष नाही असे म्हणत आहेत. शेतक-यांच्या मोटारीला वीज माफी दिली आहे. दुधाला एक लीटरला पाच रुपये अधिकचे अनुदान दिले आहे. सर्वसामान्य जनेतेचे सरकार आहे. विरोधकांनी अगोदर विरोध केला. न्यायालयात गेले, तिथे टिकले नसल्याचे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, महिलांच्या चेह-यावर हसू, आनंद दिसत असल्याने ही योजना तात्पुरती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, योजनेचे सातत्य टिकविणे महिलांच्या हातात असून महायुतीला पाठबळ द्यावे. ५ वर्षात नव्वद हजार रुपये दिले जातील. लोकसभेला राज्यघटना बदलणार असे सांगितले.
आता त्यांच्या कथानकाला बळी पडू नका, महायुतीचे सहकारीही उत्साहाच्या भरात पैसे परत घेणार असे सांगत आहेत. मात्र, हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.