पुणे : पुण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात रोजगाराच्या शोधात लोक येतात. त्यांना पाणी, आरोग्य, निवारा आदी सुविधा पुरवाव्या लागतात. शहरानजीकच्या गावात बेकायदेशीर बांधकामे, रस्त्यांचे प्रश्न निर्माण होत आहेत. शहरांचा सुव्यवस्थित विकास होण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका असणे आवश्यक आहे. त्यासाठीच देहू, आळंदी, चाकण, राजगुरूनगर मिळून एक महानगरपालिका करता येईल का, याबाबत विचार सुरू आहे, असे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
लोहगाव येथे लोहगाव-वाघोली समान पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन, धानोरी सर्वे नं. ७ येथे बांधण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार सुनील टिंगरे, चेतन तुपे, माजी आमदार रामभाऊ मोझे, मनपा आयुक्त विक्रमकुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे या वेळी उपस्थित होते. लोहगावच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील. संरक्षण विभागाच्या हद्दीत असलेला रस्ता बाहेरून काढून घेतल्यास येथील विमानतळाचे विस्तारीकरण करून मोठी आंतरराष्ट्रीय विमाने उतरू शकतील. जागेच्या मूल्यांकनाबाबत काही अडचणी असल्यास नोंदणी विभागाशी बोलून मार्ग काढण्यात येईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
इंदापूर, हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यातील शेतीला पाणी कमी पडत आहे. पाणी बचत व्हावी म्हणून कालव्याऐवजी बोगदा करण्याचे नियोजन आहे. पुण्याच्या पाण्यासह, शेतीला पाणी मिळावे म्हणून टाटाच्या धरणातून पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वापरलेले सांडपाणी प्रक्रिया करून शेतीला देण्यायोग्य करण्यासाठी आवश्यक तेथे एसटीपी उभारण्यात येतील. लोहगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पीएमपीएमएलची बीआरटी लेन बंद केली. तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. रिंग रोड झाल्यानंतर हा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटेल. नागरिकांना सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भरीव वाढ केल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून विविध आस्थापनांमध्ये युवांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न सुरू आहेत. राज्यात नवीन युवा धोरण बनविण्यात येणार आहे. आयटीआय मध्ये रोजगारक्षम नवीन अभ्यासक्रम सुरू केले आहेत, त्याचा युवकांना फायदा होईल, असे अजित पवार म्हणाले. राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी प्रकल्प संनियंत्रण समिती केली असून त्या माध्यमातून मेट्रो, रिंग रोड, मोठी रुग्णालये, बंदरे, समुद्र किनारी मार्ग आदी प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांना गती दिली जात आहे. रस्ते डांबरी ऐवजी काँक्रिटचे करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
लोहगाव–वाघोली समान पाणीपुरवठा योजनेसाठी २३० कोटी रुपये मंजूर असून एकूण ४५० कि.मी. च्या वितरण नलिकांपैकी २३० कि.मी. नलिका फक्त लोहगावमध्येच आहेत. २० लक्ष हून अधिक क्षमतेच्या ८ टाक्या येथे असून नवीन ९ टाक्यांची कामे सुरू होत आहेत. लोहगाव उपजिल्हा रुग्णालयचे काम अंतिम टप्प्यात असून लोहगाव आयटीआय साठी निधी मंजूर आहे. रस्ते, भूमिगत सांडपाणी वाहिन्या यासाठी निधी मंजुरीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आमदार सुनील टिंगरे यांनी दिली.