पुणे : माझ्या निवडणुकमध्ये माझी भावंड कधीच फिरली नाहीत. इतकी गरागरा आता या निवडणुकीत फिरत आहेत. निवडणूक संपल्यानंतर यापैकी एकही तिकडे थिरकणार सुद्धा नाहीत. निवडणूक झाल्यानंतर अजित पवार आणि त्याचे कार्यकर्तेच या भागातील लोकांचे प्रश्न समजून घेणार, हे कोणीही विसरू नका. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तशा या छत्र्या आहेत.
काही दिवसांनी परदेशात हवाई सफर करायला ते निघून जातील. मी गप्प बसतोय याचा अर्थ तुम्ही फार वळवळ करू नका, मी जर तोंड उघडलं तर तुम्हाला फिरता सुद्धा येणार नाही, हे विसरू नका असा इशाराच अजित पवारांनी त्यांच्या भावंडाना दिला आहे. बारामती येथे अजित पवार यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, गेल्या कित्येक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचाराला यावे लागले नाही. शेवटची सभा घेऊन मतदान करून निघून जात होता. आता अस काय झाल की तुम्हाला मतदारसंघात इतके फिरावे लागत आहे, असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता यांचा केला. नमो रोजगार मेळाव्यात आम्ही दहा हजार नोकऱ्या तरी दिल्या. तुम्ही एक हजार लोकांना तरी आजपर्यंत नोकऱ्या दिल्या का? असा सवाल त्यांनी सुप्रिया सुळे यांना उद्देशून केला.
पुढच्या पिढीने पक्षाचे काम हातात घेतले याचा अर्थ पक्ष चोरला असा होत नाही. आम्हीही पक्षासाठी योगदान दिलेले आहे. ८० टक्के आमदार माझ्यासोबत येतात याचा अर्थ कुठेतरी काहीतरी योग्य घडत असेल. सतत तुम्ही म्हणाल तेच बरोबर असे दरवेळेस कसे चालेल, असा सवाल अजित पवार यांनी शरद पवार यांना केला.
बारामती विधानसभा मतदारसंघात मतदारांनी काय निर्णय घ्यायचा हे त्यांनी ठरवायचं, मात्र, इतर पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आज आघाडीवर राहणार आहे. हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, दशरथ माने, विजय शिवतारे, दिगंबर दुर्गाडे, दादा जाधवराव, बाबा जाधवराव, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, राहुल कुल, वासुदेव काळे, रमेश थोरात यांच्यासह पदाधिकारी मनापासून महायुतीच्या उमेदवाराचे काम करत आहेत, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.