खेड (पुणे): राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी लढवणाऱ्या संभाव्य लोकसभा मतदारसंघात दौरे सुरू केले आहेत. बुधवारी 20 मार्च रोजी अजित पवार यांनी खेड तालुक्याचा दौरा करत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केले. शिरूर मतदारसंघामध्ये येणाऱ्या आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, भोसरी या भागांचा दौरा पवार यांनी केला. यावेळी पवार यांनी खेडचे आमदार आमदार दिलीप मोहिते पाटील यांची भेट घेतली.
यावेळी कार्यकर्त्यांना अजित पवार मार्गदर्शन करत असताना त्यांच्या काही जणांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, अशी मागणी केली. त्यानंतर या मागणीवर अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत एक मिश्किल विधान केले. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेचा विषय बनला आहे.“ज्या वेळेस आमदार दिलीप मोहिते पाटील मंत्री होतील, तेव्हा मी मुख्यमंत्री होईल”, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघ अजित पवार गट लढवणार असल्याची चर्चा आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शिवाजीराव आढळराव पाटील या तिघांमध्ये चर्चा झाली. मात्र, या चर्चेत नेमके काय ठरले? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच अजित पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी देखील जाहीर झालेली नाही. त्यामुळे कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार निवडणूक लढणार? हे नक्की झालेले नाही.