पुणे : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ जून महायुती सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर केला. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी ‘लाडकी बहीण योजना’ राबवणार असल्याची घोषणा केली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे मुख्यपत्र सामना अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी?
मागील अडीच वर्षे राज्यातील ‘लाडक्या बहिणीं’ चा सरकारला विसर पडला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीतील दणक्याने त्यांना अचानक ‘बहिणीं’ची उचकी लागली आहे. यातूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
तसेच “लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस लावण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही त्याने?, अशी टीका देखील सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांच्यावर केली आहे. ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तींचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? असा सवालही यावेळी करण्यात आला आहे.
लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ ड्रग्जच्या विळख्यात
पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुणे-नाशिकमध्ये ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. अनेक शेतकरी भाऊ आजही आत्महत्या करत असल्याने या भावांसाठी बहिणी आक्रोश करत आहेत. त्या भावांना तर सरकारने वाऱ्यावरच सोडले आहे. तरीही बहिणींच्या नावाने ही जुमलेबाजी करण्याचे धाडस सत्ताधारी करीत आहेत, असा घणाघात सामना अग्रलेखातून केला आहे.
महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला
महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हा देखील प्रश्न आहेच. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे ‘अनाथ’ करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे, असंही या सामना अग्रलेखा म्हटलं आहे.