सुपे : जनाईच्या पाण्यासाठी मुंबईला अन्यथा कोठेही जा, काम माझ्याशिवाय होणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जनाईच्या पाण्यासाठी शेतकरी संघर्ष कृती समिती कुणालाही भेटत आहेत. त्यावर सुपे येथील माउली गार्डन येथे दुष्काळी पाणीटंचाईसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने धरणांची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे पाणी सोडण्यात अडचणी येत आहेत. मात्र जनाईच्या पाण्याबाबत नेहमीच अधिकाऱ्यांना सांगून अधिकचे पाणी कसे देता येईल ते सांगितले आहे. पूर्वी पुण्याला ५ टीएमसी पाणी लागत होते आत्ता २० टीएमसी लागत आहे. येथे कालवा पाइपलाइन करावी, अशी मागणी आहे. मात्र ते तुम्हालाच पुढे जड जाणार आहे. तुम्ही म्हणाला तर तेही करू. सुप्यात ग्रामपंचायतीने जागा दिल्यास जलसंपदा शाखेचे ऑफिस काढू तशा सूचनाही पाटबंधारे विभागाला दिल्या.
पाणीपट्टी वेळेवर भरा
जनाईचे विजेचे बिल कमी होणार नाही. मागील चार महिन्यांपूर्वीच ५ पट असणारे वीजबिल एक पट केले आहे. त्यामुळे शासनावर ७०० कोटींचा वीजबिलाचा बोजा पडला आहे. त्यामुळे जनाई, शिरसाई आणि पुरंदर या योजना लवकरच सोलरवर सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना केल्या आहेत. सोलर योजनेची पहिली सुरुवात जनाईपासून करा, असे सांगत शेतकऱ्यांनी पाणीपट्टीचे बिल वेळोवेळी भरणे आवश्यक असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.