बारामती: अजित पवार शनिवारी 24 फेब्रुवारी रोजी बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांचे शनिवारी तीन मेळावे पार पडणार आहेत. खडकवासला, भोर आणि मुळशी तालुक्यात अजित पवारांचे कार्यकर्ता मेळावे होणार आहेत. तसेच अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या काही पक्ष प्रवेशही पार पडणार आहेत.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघावरून पवार कुटुंबियांमध्ये प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. अजित पवार यांनी पहिल्यांदा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केल्यानंतर आता स्वतः बारामती पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे, तर पत्नी सुनेत्रा पवार यांनी सुद्धा आता बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावत वातावरण तापविण्यास सुरुवात केली आहे.