पुणे : दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभास उपस्थित राहण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले आहे. संमेलनाच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. २३ फेब्रुवारी रोजी आयोजित समारोप सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती असणार असून, उपमुख्यमंत्री पवार यांनी याप्रसंगी उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. संमेलनाचे आंतरराष्ट्रीय समन्वयक डॉ. सतीश देसाई आणि व्यवस्थापन समिती सदस्य युवराज शाह यांनी पवार यांची भेट घेऊन संमेलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.
निमंत्रणाचा अजित पवार यांनी स्वीकार केला असून, अनेक वर्षांनंतर दिल्लीत संमेलन होत असून मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आणि शासन म्हणून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली असल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले.