पुणे : आगामी लोकसभेसाठी सर्वच पक्षाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यास सुरुवात झाली आहे. अशातच अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना प्रेमळ दम दिला आहे. पुण्यात महायुतीचा पहिलाच मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, तुमच्या माझ्या घरचे लग्न नाही, नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. असा प्रेमळ इशाराच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने सगळी कामं करायची आहेत. कोणीही रुसून आणि नाराज होऊन काम करु नका, त्यासोबतच कार्यकर्त्यांनी मतदार संघात कसं वागलं पाहिजे, प्रचार करताना कोणत्या पद्धतीची भाषा पाहिजे, याचे धडेदेखील अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. आपल्या महायुतीतील एकही कार्यकर्ता बाहेरच्या पक्षात जाणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहन देखील अजित पवारांनी यावेळी केलं आहे.
तसेच कार्यकर्त्यांनी आपली भाषा नीट ठेवली पाहिजे. साधारण मतदार संघात फिरताना कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारांशी आणि विरोधात असलेल्या मतदारांशीदेखील नीट वागलं पाहिजे. विरोधात असलेल्या मतदारांशी हुज्जत न घालता त्यांच्यासोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवलं पाहिजे. आपल्याकडून कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घ्या, असंही पवार यांनी सांगितलं.
सध्या अनेक ठिकाणी रुसवेफुगवे दिसत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याला बोलवलं नाही, आपला फोटो लावला नाही, या क्षृल्लक कारणावरुन रुसु नये, आपले सगळे मतभेद दूर केले पाहिजे. हे आपल्या घरचं लग्न नाही आहे. तर आपल्याला मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे’, असा प्रेमळ दम अजित पवारांनी दिला आहे.