शिरुर, (पुणे) शिरुर तालुक्यात पुढील काळात राष्ट्रवादीमय वातावरण होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे अजित पवार सभेत बोलत होते. त्यावेळी बोलताना थेट खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिले.
पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणाले. मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार मिळाला नाही की आम्ही कलाकार पुढं आणतो, असा टोला अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांना पाडणारचं असा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. अमोक कोल्हे यांना आव्हान दिल्यानंतर आज अजित पवार हे शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली आहे.
आता परत दंड थोपटले
तसेच राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन ही निवडून आले अन मग राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. मध्ये शिवनेरीवर मला खासदार भेटले. मी म्हटलं का ओ डॉक्टर आधी राजीनामा द्यायचं म्हणत होते, आता परत दंड थोपटले. हो, दादा आता परत लढायची इच्छा झाली, असं कोल्हे म्हणाल्याचे सांगत अजित पवार यांनी अमोल कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल चढवला.
लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार कोल्हे म्हणतील आता यापुढं मी काम करेन. बघा आत्ता ही त्यांचे नाटकाचे प्रयोग सुरु आहेत. त्यातून ते वातावरण निर्माण करत आहेत. ही तात्पुरती आहे. महाराजांचा इतिहास आपल्याला जपायचा आहे, पण कोल्हे यांनी पाच वर्षे काय केलं, याचा ही विचार करा, तसेच लोकसभेसाठी माणसातला माणूस उभा करणार आहे. तुम्ही एकदिलाने काम करा आणि त्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहनही अजित पवार यांनी केलं आहे.