बारामती: मी ६५ वर्षांचा झालोय. मी समाधानी आहे. जिथं पिकतं, तिथं विकत नसतं. एकदा बारामतीकरांना मी सोडून कुणीतरी दुसरा आमदार मिळाल्यावर मग तुम्ही १९९१ ते २०२४ च्या माझ्या कारकीर्दीची व त्या नव्या आमदाराच्या कारकीर्दीची तुलना करा. मग तुम्हाला माझी किंमत कळेल, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केले. अजित पवार यांनी बारामतीमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे सांगितल्यानंतर चर्चेला उधाण आले.
बारामती राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे कार्यकत्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. याप्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुनील पालवे, रणजीत तावरे, संभाजी होळकर, सचिन सातव, जय पाटील, अविनाश बांदल, पुरुषोत्तम जगताप, पोपट गावडे, सुनील पवार, साधू बल्लाळ, मदन देवकाते, अनिता गायकवाड, ज्योती लडकत, द्वारका कारंडे, रेश्मा ढोबळे, करण खलाटे, अविनाश गोफणे, विक्रम भोसले, राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, आपण बारामतीचा सर्वांगीण विकास केला. राज्यातील इतर मतदारांपेक्षा जास्त निधी दिला. मीदेखील एक माणूस आहे. मला कधी कधी विचार येतो की, एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. आता मला राजकारणात ३५ वर्षे झाली, मी तर आता दुसरा खासदार राज्यसभेवर पाठवू शकतो. त्याआधी संसदीय समितीने सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली होती. त्यामध्ये राजेश विटेकरला आमदार केले. शिवाजीराव गर्जे यांना आमदार केले.
आता राज्यपाल नियुक्त आमदारांचे काय होतेय माहिती नाही. पण, जर यंदाच्या निकालासारखी गंमत होणार असेल, तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं. मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झाले तुम्ही बघा. काही जण बेताल वक्तव्ये करतात. पण अशा वक्तव्यांचे आम्ही कधीच समर्थन केले नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने एक विधान केले त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मते मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.