नाशिक : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. नाशिक येथील १०० पदाधिकाऱ्यांनी आज बारामती येथील गोविंद बागेत शरद पवार यांची भेट घेत शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, गेल्या दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांची साथ सोडून सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केलं होतं. मात्र, दोन वर्षात अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे.
शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढत लोकसभा निवडणुकीत तब्बल ८ उमेदवार निवडून आणले. तर अजित पवार यांच्या पक्षाला फक्त एका जागेवरच विजय मिळवता आला. त्यामुळे अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक पदाधिकारी पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतताना दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं चांगलंच टेन्शन वाढलं आहे.
भगीरथ भालके यांनीही घेतली शरद पवारांची भेट
पंढरपूर तालुक्यातील भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे. काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी सोडून भालके यांनी बीआरएस मध्ये प्रवेश केला होता. आज गोविंद बागेत भालके यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना भालके म्हणाले कि, पंढरपूर तालुक्याच्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे भालके म्हणाले.