पुणे : आम्ही सुद्धा आरेला कारे करू शकतो. पण, वातावरण आम्हाला खराब करायचं नाही. जे साथ देतील त्यांना सोबत घेऊ, असं अजित पवार म्हणाले आहेत. अजित पवार यांनी विजय शिवतारे यांच्या आक्रमक पवित्र्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेणार असून बैठकीमध्ये मार्ग काढू असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजावलं आहे. त्यामुळे वरिष्ठांचे ऐकायचे की नाही? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी मी कोणत्याही प्रकारे बांधिल नाही. एक-दोन दिवसात शिंदेंसोबत बैठक होणार आहे. तसेच महायुतीमधील वातावरण खराब होईल असं काही माझी बोलण्याची इच्छा नसल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच, महायुतीमधील 80 टक्के जागांचा निर्णय झाला आहे. 20 टक्क्यांसाठी आम्हाला आणखी एकदा बसावं लागणार आहे. बारामतीच्या निवडणुकीवरून कोण कुठे उभं राहणार हा संविधानाने दिलेला हक्क असल्याचे अजित पवार म्हणाले.