पुणे : बारामतीमध्ये मतं मागण्याची काहीतरी लेव्हल होती. ही लेव्हल आता सोडायला लागले असून लोकांना भावनिक केलं जात आहे. त्यामधून काही सांगितलं जात आहे. नुसतं संसदेत भाषणं करून माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत. हा अजित पवारही भाषणात नंबर एकचा आहे. माझी पट्टी लागली तर मीही भाषणं करतो. पण मी भाषणंही करतो आणि कामंही करतो.
मी विकासाला निधीही आणतो आणि एखादं काम वाजवून करून घेतो, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचारादरम्यान बोलत होते.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आणि महायुतीसाठी प्रतिष्ठेचा ठरला असून या मतदारसंघातून एकाच घरातील दोन महिला एकमेकांविरोधात उभ्या राहिल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. तर, आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारच या प्रचाराला उतरले असून त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे.
तसेच पुढं बोलताना म्हणाले, १९९१ ला खासदारकीला लेकाला म्हणजेच मला निवडून दिलं. नंतर वडिलांना निवडून दिलं. नंतर लेकीला निवडून दिलं. आता सुनेला निवडून द्या. सगळी फिट्म फाट. वडील, लेक, कन्याही आणि सूनही खूश आणि तुम्ही खुश, अशी कोपरखळीही अजित पवारांनी यावेळी मारली.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून गेल्या अनेक वर्षांपासून येथे पवार-सुळेंची सत्ता आहे. आता पवार विरुद्ध सुळे असा जंगी सामना रंगला आहे. त्यामुळे बारामतीकर कोणाला निवडून देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.