पुणे : शरद पवार यांना सोडणं ही माझी चूक होती, अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर कार्यक्रमात कबुली दिली आहे. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मुलगी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. भाग्यश्री आत्राम- हलगेकर यांना पक्ष न सोडण्याचा सल्ला देताना अजित पवार यांनी काका शरद पवार यांना सोडण्याची चुकी आपल्याकडून झाल्याची कबुली दिली आहे. अजित पवार यांची जन सन्मान यात्रा आज गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात होती. या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी यावर भाष्य केलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी काका शरद पवारांचा हात सोडला अन् ते महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबात फूट पडली आहे. काहींनी अजित पवारांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. तर काहींनी त्यांना विरोध केला. मात्र, या निर्णयाबद्दल स्वत: अजित पवारांना काय वाटतं? महायुतीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराने अजित पवार या बोलते झाले.
काय म्हणाले अजित पवार?
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची लेक भाग्यश्री आत्राम- हलगेकर लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. यावर बोलताना अजित पवार यांनी झालेली चूक मान्य केली आहे. वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतला आहे. ती माझी चूक मी मान्य केली आहे, अशी कबुली अजित पवार यांनी दिली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, धर्माराव बाबाच्या मुलीने दुसऱ्या पक्षात जाण्याचा ठरवलं आहे, अस बाबाने मला सांगितलं. ती आता बाबाच्या विरोधात उभी राहील म्हणतेय, पण हे शोभतं का? तुम्ही अशा गोष्टीत लक्ष देऊ नका. मी तिला सांगू इच्छितो की, वस्ताद सगळे डाव शिकवतो. पण एक डाव स्वतःसाठी राखून ठेवतो. तो डाव दाखविण्याची वेळ येऊ नये. म्हणून मी सांगतो, तुम्ही बाबाच्या मागे उभे राहा. त्यांना निवडून आणा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.