आंबेगाव, (पुणे) : बारामतीमध्ये काकी विरुद्ध आत्या अशी लढत झाली तर सुनेत्रा काकींविरोधात मी बोलणार नाही, कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली आहे. असं रोहित पवार म्हणाले आहेत. आज आंबेगावमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. त्याआधी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
तसेच पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्यावरही जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. बारामती लोकसभेत सुनेत्रा काकींविरुद्ध आत्या अशी लढत झालीच. तर आम्ही सुनेत्रा काकींविरोधात बोलणार नाही. कारण त्या आतापर्यंत राजकारणात नव्हत्या. त्यांनी केवळ समाजसेवा केली आहे. त्यामुळं बारामतीत खरी लढत ही सुप्रिया ताई विरुद्ध अजित दादा अशी असणार आहे, म्हणून अजित दादांविरोधात बोलू, असं रोहित पवार म्हणाले.
अजित दादा सध्या कुटुंबात एकटे आहेत, असं चित्र आहे. मात्र ते सध्या स्वतःसाठी आणि मलिदा गॅंग साठी बोलत आहेत, असा टोलाही रोहित पवार यांनी यावेळी लगावला आहे. त्याशिवाय युगेंद्र पवार म्हणत असतील ‘शरद पवार साहेब तसं’, म्हणजे याचं स्वागत करायला हवं. आमच्या सारख्या बच्चाला हे कळतंय, साहेबांना साथ देण्याची गरज आहे, असंही रोहित पवार म्हणाले.
मी पुन्हा येईन नंतर आता अमोल कोल्हे यांना पाडणार असं अजित पवार सतत म्हणतात. आता अमोल कोल्हे यांच्याविरोधात पार्थ पवार ही असू शकतात. मात्र अजित दादांना महायुतीत चार जागा मिळतील, पण त्यात शिरूर लोकसभा मिळायची नाही. दरम्यान, महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील शुरुर आणि बारामती मतदारसंघावर दावा केला होता, तो दावा आजही कायम आहे. पुढील काही दिवसांत महायुतीमध्ये जागावटपाची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर कुणाला किती जागा मिळतील ते लवकरच समोर येईल.