दीपक खिलारे
इंदापूर : इंदापूर तालुका हा विकासाच्या बाबतीत पन्नास वर्षे मागे गेला असल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. विधानसभा निवडणुकी संदर्भातील पुढचा निर्णय सगळ्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली. बावडा (ता. इंदापूर) येथे रत्नाई निवासस्थानी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातील जनतेशी आयोजित सुसंवाद कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील बोलत होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, इंदापूरात राष्ट्रवादी काँग्रेस यात्रेत झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभेच्या जागेसंदर्भात जे बोलले ते महायुतीच्या धर्माचे पालन करणारे नव्हते. इंदापूर विधानसभेच्या जागेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द पाळणार, असे सांगणारे अजित पवार हे सदरच्या सभेत महायुतीचा संकेत डावलून बोलले, त्यांना महायुतीमध्ये हा अधिकार कोणी दिला? अशी विचारणा मी अजितदादा पवार यांना देखील करणार आहे.
लोकसभेला आमचा पाठिंबा घ्यायचा, मात्र विधानसभेला विरोध
ते पुढे म्हणाले, लोकसभेला आमचा पाठिंबा घ्यायचा, मात्र विधानसभेसाठी आम्हाला विरोध करायचा हे सूत्र गेले चार निवडणुका आपण अनुभवत आहे. मी ज्या पक्षात होतो, त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. मग माझ्या आमदारकीच्या निवडणुकीस विरोध का ? असा संतप्त सवाल करत मी स्वाभिमानी आहे. आता अपमान सहन करणार नाही, अशी गर्जना करत हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुक लढण्यासाठी रणशिंग फुंकले आहे.
राम कृष्ण हरी वाजवा तुतारी; कार्यकर्त्यांची घोषणा
इंदापूर तालुक्याच्या सर्व भागातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी आगामी दोन-चार दिवसात चर्चा करून निर्णय घेणार आहे. सध्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन येत आहेत. परंतु कोणाला होकार दिलेला नाही असे सूतोवाच हर्षवर्धन पाटील यांनी केले. सर्वांना विचारून निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट ग्वाही देत हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी ” अशा घोषणा दिल्याने कागल येथील समरजित घाडगे यांच्यानंतर इंदापूर पॅटर्न होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही हल्लाबोल
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना जायचे त्यांना थांबवू शकत नाही, असे माझे नाव घेवून केलेले वक्तव्य कोणतासंदर्भ घेऊन केले हे समजत नाही. कारण मी अजून कोणते ही जाहीर वक्तव्य केले नाही. कोणताही पक्ष हा जनतेच्या पाठबळावर चालतो. जनतेच्या भावना काय आहेत, याचा विचार करू, चर्चा करू, एकत्र बसू, सगळ्यांशी विचार विनिमय करू तसेच भाजपच्या वरिष्ठांशीही चर्चा करू. मात्र कोणताही निर्णय अंधारात घेणार नाही, स्वाभिमानाने घेतला जाईल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
आमच्यामुळे तालुक्यात भाजपला जनाधार
तालुक्यात भाजप उमेदवारास आमदारकीच्या निवडणुकीत केवळ ५२०० मते पडली होती. मात्र हर्षवर्धन पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश करताच एक लाख बारा हजार मते पक्षास पडली. त्यामुळे आपण भाजप चे प्रामाणिक काम केले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हर्षवर्धन पाटील यांना पक्ष सोडायचे असेल तर सोडू द्या असे कसे म्हणतात. यावरून यावेळी कार्यकर्त्यांमध्ये भाजप बद्दल जाहीर नाराजी दिसून आली.