शिरूर, (पुणे) : शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे. या पक्षप्रवेशावेळी अजित पवार प्रसारमाध्यमांशी बोलत होते, त्यावेळी अमोल कोल्हे यांच्यावर अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
अमोल कोल्हे तुम्ही नथुराम गोडसेंची भूमिका केली आहे, हे सांगून दाखवा. तुम्ही व्हाय किल्ड गांधी यात नथुराम गोडसेची भूमिका केली होती. तुम्ही महाराजांच्या भूमिका केल्याचं सांगता, पण एकदा नथुराम गोडसेंची भूमिका केल्याचं सांगा. बघू मग काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतात का, असं आव्हान अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना दिलं आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शिवाजी आढळराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मान-सन्मान ठेवला जाईल. जुना-नवा असा कोणताही वाद केला जाणार नाही. आजची सभा अमोल नाही तर अनमोल आहे, असा टोलाही अजित पवार यांनी कोल्हे यांना लगावला.
2019 साली मी अमोल कोल्हेंना गाठलं
शिरूर लोकसभा आपल्याला मिळावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असायचो. 2009 साली विलास लांडे पडले, 2014 साली तर मोदींची लाट होती, त्यावेळी 3 लाखांच्या फरकाने हा गडी निवडून आला होता. 15 वर्ष हा बाबा काय हलेना. मग 2019 साली मी अमोल कोल्हेंना गाठलं, पण कोल्हे काय तयारच होत नव्हते. आता एखादा राजकीय नेता पडत नसेल तर तिथे कलाकाराला उभं केलं जातं.
अमिताभ बच्चन, गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा. या अभिनेत्यांप्रमाणे कोल्हेंना उभं केलं, ते खासदारही झाले, मात्र या बाबाने मतदारांशी संपर्क ठेवला नाही, सगळे नेते ही तक्रार करायला लागले. मलाही हे पटलं नाही,’ असं अजित पवार म्हणाले.
कोरोना काळात एक दिवस माझ्याकडे आले अन् म्हणाले मला काय हे झेपेना. आता मी राजीनामा देतो, समाजाचे हित एखादा नेता जेव्हा जोपासतो तेव्हा आपल्याला जुळवून घ्यावं लागतं. आता शिवाजीराव आढळराव मोठे उद्योजक आहेत, मात्र त्यांनी जनतेसाठी स्वत:ला झोकून दिलं आहे. या दोघांची तुलना केली तर लक्षात येतं की आढळराव सरस आहेत, असं वक्तव्य देखील अजित पवार यांनी केलं आहे.