पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात दिवसेंदिवस कोयता गँगची दहशत वाढू लागली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोयता गँगमुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या कोयता गँगचा सुपडा साफ करणार, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. ते पुण्यातील एका सभेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात होते. त्यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अजित पवारांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी पुण्याच्या विविध समस्या अधोरेखित करत लवकरच उपाययोजना करणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले.
यावेळी बोलताना कोयता गँगवर त्यांनी भाष्य केल. अजित पवार म्हणाले, कसली कोयता गँग रे? कोयता गँगचा सुपडा साफ करणार आहे. या गोष्टी अजिबात खपवून घेणार नाही. ते पोरगं किती ही मोठ्या बापाचं असलं तरी सुद्धा आता काही चालणार नाही. काही लोकं म्हणतात की आता चूक झाली, पदरात घ्या… पदर फाटला आता… पदर नाही, धोतर नाही आता डायरेक्ट टायरमध्ये…असं अजित पवार यांनी गुंडगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.