जीवन सोनवणे
नसरापूर : महायुतीने सर्व मतदारसंघांमध्ये योग्य आणि सक्षम उमेदवार निवडण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. मला खात्री आहे की, हे उमेदवार राज्याच्या विकासासाठी मोठे योगदान करतील. भोर वेल्हा येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँगेस पार्टीकडून शेतकरी व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्यासाठी महत्त्वाची आहे. आपल्या राज्याला पुढे नेण्यासाठी मजबूत आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे. महायुती हेच सरकार देऊ शकते. धरणातील पाणीसाठा कमी आहे निरादेवघर व गुंजवणी नदीच्या पाण्यावर अनेकांचे संसार अवलंबुन आहेत. रायरेश्वर किल्ल्यावर पुरातत्व विभागाच्या मदतीने मंदीराचे काम करणार आहे. तसेच दोन आपत्यावर थांबा आणी संसार चांगला करा नाही तर अल्पभुधारक अत्यल्प भुधारक नंतर भुमीहिन होताल.
३२ वर्ष मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष होतो. मी कडक बोलत असतो, म्हणूनच माझं नाणं खणखणून वाजतं. आधी काही कारणास्तव मी इकडे येत नव्हतो, मला पायात घालून काम करायला जमत नाही, आता तसं राहील नाही. उद्याचा महायुतीचा उमेदवार जो कोण असेल त्याला मतदान करा, त्याची निशाणी घड्याळ असणार आहे, अशी नम्र विनंती करायला आलो आहे. कुठे भावनिक होऊ नका, घड्याळाला मतदान करा. असं आवाहन अजित पवार यांनी या वेळी केलं.
पुढे म्हणाले, नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. त्यासाठी सर्व्हे करण्यात आला असून ६५ टक्के लोकांनी मोदींना पसंती दिली आहे. महानंद डेअरी कुठे गेली नसून गोरेगावलाच आहे. तिकडे येऊन बघा विरोधकांना बोलायला काही राहील नाही, त्यामुळे ते अशी चर्चा करत आहेत .आम्हाला वरिष्ठांचा अपमान करायचा नाही, मला काम करायचं आहे. आपल्याला पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणायचं आहे. कारण आपल्या देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असही अजित पवार म्हणाले.