पुणे : राष्ट्रवादी पक्षातील बंडानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुन्हा एकदा एकत्र भेट झाली. शरद पवार यांचे लहान बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त भेट झाली. पुण्यातील बाणेरमध्ये प्रतापराव पवार यांचे निवासस्थान आहे. या ठिकाणी शरद पवार, अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबातील बहुतेक सर्वजण उपस्थित होते. शरद पवार हे त्यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त गेले होते. ही भेट संपूर्णपणे कौटुंबिक आहे, असं शरद पवार यांच्या बहीण सरोज पाटील यांनी सांगितलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले. अजित पवार हे आज सायंकाळी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ही दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भेटीवेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र आहे. त्या पार्श्वभूमीवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. पवार कुटुंबियांनी काय करावे, हे त्यांचा विषय आहे. त्याबद्दल मी काय बोलणार ? मी पार्टीचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. जर पार्टीबद्दल काही असेल तर बोला, असं जयंत पाटील म्हणाले.