पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर खऱ्या अर्थाने आगामी विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कसोटी लागणार आहे. बारामती विधानसभा मतदारसंघ हा पवारांचा तसेच राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही बारामतीकरांनी शरद पवारांना साथ दिल्याचे सर्वांनी पहिले. या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळे यांना मोठी आघाडी मिळाली. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पर्यायी मतदारसंघाची शोधाशोध करण्यास सुरुवात केल्याची चर्चा जोरात आहे. गुरुवारी बारामतीत बोलताना विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यानंतर अजित पवार हे शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरुर-हवेली हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे. शिवसेना -भाजप युतीतमध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच राहिला होता. या विधानसभा मतदारसंघावरील दावा भाजपने सोडला असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच या मतदारसंघात भाजपने इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या नाहीत.
पुणे जिल्हा आणि शहरातील भारतीय जनता पक्षाला मिळणाऱ्या सर्व जागांवर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, शिरुर-हवेलीत मतदारसंघात घेतल्या मुलाखती नाहीत. मुलाखती न झाल्याने भाजपमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. भाजप कार्यकर्त्यांना पक्ष श्रेष्ठींकडूनही कोणतेही ठोस आश्वासन नाही. सध्या राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार हे शिरुर-हवेलीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी शिरुर-हवेलीमधून निवडणूक लढवल्यास ते विजयी होण्याचा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना खुलं चॅलेंज दिलं होतं. ‘पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच मी बघतो, असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना थेट आव्हान दिलं होतं. अजित पवारांच्या आव्हानानंतर अशोक पवारांनी देखील जोरदार पलटवार केला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या चॅलेंजनुसार स्वतः मैदानात उतरत अशोक पवार यांचा पराभव करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.