पुरंदर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले अर्ज माघारी घेण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीकडून बंडखोरांना थोपवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. अनेक ठिकाणी त्यामध्ये यश आले असले, तरी पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघात शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित दादांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.
२०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यामध्ये राजकीय वैर पाहायला मिळाले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तह झाला आणि हे नेते एकत्र आले. परंतु, आता लोकसभेवेळी झालेला हा तह विधानसभा निवडणुकीत तुटला असल्याचा पाहायला मिळत आहे. महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विजय शिवतारे यांना उमेदवारी दिली असताना या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे.
सोमवारी (दि. ४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पुरंदरमध्ये पुन्हा एकदा तह होईल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपला उमेदवार मागे घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. परंतु, संभाजी झेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महायुतीतील एकमेव मैत्रीपूर्ण लढत ही पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये पहायला मिळणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी झेंडेंना निवडून आणायचे आणि शिवतारेंना पाडायचं हे ठरवले असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.