पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालं आहे. बारामतीमधील कमी झालेल्या टक्केवारीवरून ‘हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली. या बैठकीत पुणे शहरातील महायुतीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. येत्या १३ मे रोजी पुणे लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यासंदर्भात रणनीती आखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत अजित पवारांनी बारामतीत कमी झालेल्या टक्केवारीवरून नाराजी व्यक्त केली. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्यासमोर अजित पवार यांनी खंत बोलून दाखवली आहे. ‘हल्ली कुणाला भाषणाला बोलवायचीही मनात भीती वाटते, अशा शब्दांत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे चंद्रकांत पाटील यांचे शरद पवारांबाबतचं ‘ते’ विधान भोवल्याची अजित पवारांच्या मनात अजूनही शंका असल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार यांचा पराभव हा आम्हाला महत्वाचा : चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. “शरद पवार यांचा पराभव हा आम्हाला जास्त महत्वाचा वाटतो”. राज्यात २०१९ मध्ये शरद पवारांनी शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली. आता संधी मिळाली आहे. मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा आहे, इतना काफी है…बाकीच्या गोष्टी कमी महत्वाच्या आहेत, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी सवांद साधताना केलं होतं.