पुणे : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा आज शपथविधी पार पडणार आहे. नरेंद्र मोदी आज सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या समोर संध्याकाळी हा भव्य शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठ विधान केले आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले, जे नेते शरद पवार साहेबांना सोडून गेले आहेत. त्यांना व्यक्तिगत खूप काही मिळालं आहे. प्रफुल्ल पटेल यांना व्यक्तिगत गिफ्ट देण्यात आले आहे. ईडीने त्यांची प्रॉपर्टी सोडवली, जी सील केली होती. त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही तरी व्यक्तिगत गिफ्ट मिळालं आहे. आता जे साहेबांना सोडून गेले. त्यांना विधानसभा निवडणुकीत एकच पर्याय असेल, ते म्हणजे राष्ट्रवादीऐवजी भाजपच्या चिन्हावर त्यांना विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीत हात धुवून घेतले. प्रफुल्ल पटेल यांची ईडीची कारवाई संपली आहे. अजित दादा, सुनील तटकरे यांची अजून सुरु आहे. म्हणजे सगळ्यात जास्त फायदा प्रफुल्ल पटेल यांचा झाला आहे. फुटलेला राष्ट्रवादी पक्ष हा आता अजित पवार यांचा राहणार नाही. आता तो भाजपचा होणार कारण एकही मंत्रिपद त्यांना मिळालं नाही. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी केंद्राकडून आपल्या राज्यातल्या लोकांसाठी काही गोष्टी मागितल्या. आपल्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी काहीच मागितले नाही, असंही रोहित पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृतीमधून “राजा का बेटा राजा नही बनेगा… जो काबील है… वही राजा बनेगा..!” हे दाखवून दिल्याची चर्चा आहे. यावरून रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना श्रीकांत शिंदे काबील वाटत नाही का? माझ्या मते श्रीकांत शिंदे काबील आहेत. आता त्यांना वाटत असेल श्रीकांत शिंदे यांच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तरी मंत्रिपद मिळावं. जरी श्रीकांत शिंदे यांना मंत्री पद मिळत नसेल तरी त्यांच्या पक्षाच्या खासदार आणि राज्यातल्या आमदारांना त्यांचेच म्हणणं ऐकावं लागेल, असे रोहित पवार म्हणाले.