पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड-राजगुरूनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांचे चुलत पुतणे शैलेश मोहिते यांनी आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत तळेगाव येथे शिवबंधन बांधले.
या वेळी आमदार सचिन अहिर, मावळचे संघटक संजोग वाघेरे, अमोल पवार, बाळासाहेब फाटक, आशिष ठोंबरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शैलेश मोहिते यांनी माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेस अशी पदे भूषविली आहेत. शैलेश मोहिते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश केला.
यापूर्वी पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग वाघेरे यांनाही उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे खेचले होते. मावळ लोकसभेत वाघरेंच्या रूपाने तर आता शिरूर लोकसभेत शैलेश मोहितेंच्या रूपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्का दिला आहे.
शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील हे आमदार दिलीप मोहितेंचे चुलत पुतणे आहेत. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस तसेच उत्तराखंड, झारखंड, छ्तीसगड, लक्षद्वीप येथील निरीक्षक आहेत. त्यांचा ठाकरे गटातील प्रवेश हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.