हडपसर, (पुणे) : “अमोल कोल्हे यांनी किती संपर्क ठेवला, किती लोकांना उपलब्ध राहिले. हे येथील जनतेला माहिती आहे. त्यामुळे आता हवेली आणि शिरुर मतदार संघाला ठरवायचं आहे. तुम्हाला कार्यसम्राट की, नटसम्राट खासदार पाहिजे, असा सवाल उपस्थित करत अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.
शिरुरमधील महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मेळावा पार पडला. या मेळाव्याला उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अजित पवार बोलत होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, अमोल कोल्हे म्हणाले होते, “माझं काम खासदाराचे नाही. दादा मी सेलिब्रेटी असून मी सिनेमात काम करणारा नट आहे. मी अभिनेता, मालिकेत काम करणारा कलावंत आहे. त्यामुळे माझ मोठं नुकसान होत आहे. यामुळे मला राजीनामा द्यायचा आहे. पण आता पुन्हा अमोल कोल्हे यांना काय झाले माहित नाही. परंतु, पुन्हा जोर आणि बैठका सुरू केल्या आहेत आणि आखाड्यात आले.
तसेच ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली मागील दहा वर्षांत देश प्रगती पथावर जात आहे. या संपूर्ण दहा वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेली विकास काम नागरिकापर्यंत पोहोचवा, आपले मतदान कसे वाढेल याकडे अधिकाधिक लक्ष द्या. पुणे शहर आणि जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा, असे आवाहन देखील अजित पवार यांनी उपस्थितांना केले.