शिरुर: देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इतकी धमक असणारा कोणताही नेता नाही. छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने यश मिळवले आहे. केंद्रात ज्याचे सरकार येणार आहे, त्या विचाराचा खासदार लोकसभेत गेला पाहिजे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून महायुतीच्या उमेदवारास निवडून द्यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार मांडवगण फराटा येथे केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोमवारी शिरुर तालुक्याचा दौऱ्यावर आले होते. मांडवगण फराटा येथे वाघेश्वर मंदिराजवळ शेतकरी मेळाव्यास व कार्यकर्त्याच्या मेळावास त्यांनी संबोधित केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर होते. माजी आमदार पोपटराव गावडे, माजी आमदार रमेश थोरात, श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील, माजी सभापती आरती भुजबळ, वैशाली नागवडे, शरद कालेवार, संतोष शितोळे तज्ञिका कर्डिले आदी उपस्थित होते .
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी पवार म्हणाले की, राज्यात सध्या शासनाच्या विविध खात्यात ७५ हजार हून आधिक पदांची भरती होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही काम करत असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्यासाठी १२५० कोटी रुपयेची तरतूद केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऊसाचे दर ही वाढविले असल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप झालेले नाही. या संदर्भात चर्चा सुरू आहे. महायुतीच्या जो उमेदवार असेल त्यास निवडून आणा, असे आवाहन त्यांनी केले.
अमोल कोल्हे यांच्यावर टीका करत अजित पवार म्हणाले की, मागील लोकसभा निवडणुकीला डॉ .अमोल कोल्हे यांना मतदान करायला सांगितले होते. त्यांना पक्षात घेत उमेदवारी दिली. आंबेगावची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांनी घेतली होती, तर शिरूर, भोसरी आणि हडपसरची जबाबदारी मी घेतली होती. त्यांना निवडून आणले. कोल्हे यांचे वक्तृत्व चांगले होते, दिसायला चांगले होते. चांगले काम करतील करतील असे वाटत होते. पण निवडून आल्यानंतर दोन वर्षाने ते माझ्याकडे आले आणि म्हणाले दादा मला राजीनानामा द्यायचा आहे. मी म्हटले की, जनतेने आपल्याला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. तुम्हाला काय अडचण आहे का? त्यावर ते म्हटले की मी कलावंत आहे. माझ्या व्यवसायावर परिणाम झाला, असे त्यांचे शब्द होते. आता पुन्हा त्यांनी निवडणुकीसाठी दंड थोपाटले आहेत. एखादा उमेदवार पराभूत होत नसेल तर आम्ही राजकारणी लोक त्याच्या विरोधात सेलेब्रिटी उभे करतो, असे सांगून त्यांनी यासंदर्भातील विविध उदाहरणेही दिली.