पुणे : पुण्यात पार पडलेल्या निर्भय बनो कार्यक्रमावेळी मोठी झटापट झाली. पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. त्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आणि आपला कोणताही कार्यकर्ता त्यात नसल्याचे म्हटले होते. त्यावर आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी एक व्हिडीओ शेअर करत अजित पवारांची पोलखोल केलीये.
काय म्हणाले प्रशांत जगताप?
भाजपसह महायुतीमधील तिन्ही पक्षांनी पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी साक्षीदार म्हणून मी तिथे उपस्थित होतो. काल निखिल वागळे यांना मारण्याचा या सर्व लोकांचा प्रयत्न होता, असा घणाघाती आरोप प्रशांत जगताप यांनी केला.
जवळपास 100 एक विटा त्या लोकांकडे होत्या, त्या सातत्याने गाडीत विटा मारल्या जात होत्या. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर हा भयानक प्रकार घडला नसता. पोलिसांना दोष द्यायचा नाही, परंतु महायुती सरकारचे किती ऐकले पाहिजे हे पोलिसांनी ठरवावे. अजित दादांना गुंडगिरी पसंत नव्हती, पण कालचा हल्ला दादांच्या पक्षातील वरिष्ठ उपाध्यक्ष दत्ता सागरे यांनीच केला याबाबत मी कोर्टात साक्षी द्यायला देखील तयार आहे, असंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा, असं म्हणत त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ॲड. असीम सरोदे, विश्वंभरजी चौधरी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यात अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी सामील होते याचा हा पुरावा ! pic.twitter.com/X5QHDa2tvs
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) February 10, 2024