योगेश मारणे
शिरूर: “दिलीप वळसे पाटील यांचा शपथविधी झाला की, या गड्याची सटकली. हा माझ्याकडे येत म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं यांच्याबरोबर काही जमणार नाही, असे त्यांनी त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना सांगितले. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या पहिले सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला मोठं गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला पवार साहेबांनी सांगितले आहे की, पुढच्या वेळेस तूच मंत्री होणार आहे. पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची आणि बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता तू मंत्री व्हायला निघाला आहेस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो हेच बघतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अजित पवार उपस्थितांना म्हणाले की, घोडगंगा साखर कारखान्याचे वाटोळे अशोक पवार यांनी केले आणि पावती आमच्या नावावर फाडत आहेत.अशोक पवार यांनी घोडगंगा बंद पाडला आणि व्यंकटेश का सुरु ठेवला? असा प्रश्न तुम्ही सर्वजण मिळून त्यांना विचारला पाहिजे. त्यांच्या कोणत्याही गोष्टींवर थोडाही विश्वास ठेऊ नका. ते धादांत खोटे बोलत आहेत. असे असते तर त्यांच्या खाजगी व्यंकटेश साखर कारखान्याला जिल्हा बँकेच्या माध्यमातून ३४८ कोटी रुपयांचे कर्ज मी मिळून दिले असते का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.
घोडगंगाच्याबाबतीत अशोक पवार यांनी अन्याय केला आहे. नको तेवढी कर्जे काढल्यामुळे घोडगंगा कारखाना अडचणीत आला आहे. दरम्यान बोलताना आमची भावकी म्हणजे कुटुंबातील काही दिवटे येतात आणि काहीही बोलतात, असा टोला रोहित पवार यांचे नाव न घेता अजित पवार यांनी लगावला. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, घोडगंगा कारखान्याच्या निवडणुकीनंतर घोडगंगाचे चेअरमन अशोक पवार यांनी स्वतः व्हायला पाहिजे होते. त्यांनी त्यांच्या मुलाला कशासाठी चेअरमन केले? असा सवाल उपस्थित करताना अजित पवार पुढे मिश्किलपणे म्हणाले की, आरे बाबा पहिले त्याचे लग्न कर. मग बाकीचे.
शरद पवार यांच्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजपसोबत जाण्याचे पहाटेच्या शपथविधी वेळीच ठरले होते. परंतु, पवार साहेबांनी अचानक निर्णय बदलला आणि शिवसेनेसोबत जायचे ठरले. यावेळी मी पवार साहेबांना विचारले तर साहेब म्हणाले की, धरणे आणि सोडणे ही आपल्या राजकारणाची स्ट्रेटेजी आहे. अशा पद्धतीने राजकारण चालत नसते, असे अजित पवार म्हणाले. केवळ मी पवार साहेबांचा मुलगा नाही, त्यामुळे मला पुढे येण्याची संधी दिली जात नव्हती, असं देखील अजित पवार म्हणाले.