बारामती : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी भिगवण चौकात एकनाथ फेस्टिव्हलच्या कमानीवरील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर काळ्या कापडाने झाकल्यावर शहरात चर्चेला उधाण आले. बारामतीत एकनाथ फेस्टिव्हल भरवला असून, येथील स्वागताच्या कमानीवर उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांचेही फोटो लावले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील सर्व गणेशोत्सवांना भेटी दिल्या. मात्र, आपल्या गणेशोत्सवाला भेट दिली नाही, म्हणून सुरेंद्र देवरे यांनी त्यांच्या पोस्टरवर काळे कापड लावले.
या घटनेनंतर तणाव वाढताच पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले. यावर सुरेंद्र जेवरे यांनी सांगितले की, एकनाथ गणेशोत्सव साजरा करत असताना मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही लोकाभिमुख कार्यक्रम ठेवले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामतीतील दौऱ्यादरम्यान सर्व गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. अगदी छोट्या छोट्या तरुण मंडळाच्या गणपतीलादेखील भेट दिली. मात्र, आम्ही विनंती करूनही अजित पवार या मंडळाकडे फिरकले नाहीत. पवार यांच्या कुटुंबातील सर्वांचे छायाचित्र या मंडळापुढे लावूनही कुटुंबातील हे कोणी तिकडे फिरकले नाहीत. त्यामुळे आम्ही नाराजी व्यक्त केली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर काळ्या कापडाने झाकले.
दरम्यान, अजित पवार यांच्या पोस्टरला काळ्या कापडाने झाकल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भिगवण चौकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला.