पुणे : पुण्यात आज एका कार्यक्रमात पवार काका पुतण्या पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर एकत्र दिसून आले आहेत. शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे जरी कार्यक्रमात एका मंचावर बघायला मिळाले, तरी यावेळी अजित पवार यांनी मात्र काका शरद पवार यांच्या शेजारी बसणं टाळलं आहे. अजित पवार आपली आसन व्यवस्था बदलून घेतलेली बघायला मिळाली आहे. यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्याच दिसून येत आहे.
अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते अशी आधीची बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाच्यावेळी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील हे शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्यभागी बसले. त्यावर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. बाबासाहेबांना शरद पवार साहेबांसोबत बोलायचं होतं, मी केव्हाही बोलू शकतो.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
बाबासाहेब पहिल्यांदाच सहकार मंत्री झाले आहेत, त्यांना साहेबांशी चर्चा करायची होती, त्यामुळे ते मध्ये बसले होते. मी तिथं असलो तरी मला बोलता येत होतं. माझा आवाज मोठा आहे. दोन खुर्च्या सोडून तिसऱ्याला देखील ऐकायला जातो, असं म्हणत अजित पवार यांनी चर्चाना पूर्णविराम दिला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी बारामतीत कृषी प्रदर्शनामध्ये देखील काका पुतण्या एकाच व्यासपिठावरती एकत्र दिसून आले होते. मात्र, त्यावेळी देखील शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळालं होतं.
.