मुंबई : पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाखालील मुळशी परिसरातील गावांसह पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्रातील पश्चिम भागात वाढत असणाऱ्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यादृष्टीने आगामी तीस वर्षांचा विचार करून मुळशी धरणाची उंची वाढवावी. तसेच मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या टप्पा 1 आणि 2 च्या माध्यमातून होणाऱ्या कामांसाठी टाटा पॉवर कंपनीबरोबर सामंजस्याने उपाययोजनांवर अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मंत्रालयात त्यांच्या दालनात मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना टप्पा एक व टप्पा दोन मधील अडचणी दूर करण्यासाठी बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी हे निर्देश दिले. मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टाटा पॉवर कंपनीचे अधिकारी सकारात्मक असल्याचे सांगत अजित पवार म्हणाले की, मुळशी आणि पुणे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी मुळशी धरणाची उंची एक मीटरने वाढविल्यास अतिरिक्त पाणी उपलब्ध होऊ शकते. यासह धरणाच्या मृतसाठ्यामधील पाण्याचा वापर करता आल्यास पाण्याची वाढीव मागणी पूर्ण होईल. टाटा पॉवर कंपनीच्या सहकार्याने या कामास प्राधान्य देण्यात यावे, असंही अजित पवार म्हणाले.